Ad will apear here
Next
‘वुमन ग्रँडमास्टर’ होण्याची ‘आकांक्षा’
आकांक्षा हगवणेबुद्धिबळातल्या चौसष्ट घरांचे आकर्षण आकांक्षाला लहानपणापासूनच होते. याच ओढीने वयाच्या सातव्या वर्षापासून ती बुद्धिबळाचे प्राथमिक धडे गिरवू लागली. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोळा वर्षांखालील स्पर्धा जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला बुद्धिबळपटू ठरली आहे. ‘क्रीडारत्ने’ या साप्ताहिक सदरात आजचा लेख बुद्धिबळपटू आकांक्षा हगवणेबद्दलचा...
..................
विश्वनाथन आनंद
बुद्धिबळ हा खेळ म्हटलं तर काही भारतीय चेहरे नक्कीच आपल्या डोळ्यासमोर येतील. परंतु या खेळात भारतीय तसे तुरळकच. विश्वनाथन आनंदने रशियन साम्राज्याला आव्हान देत खरं तर हा खेळ भारतात लोकप्रिय केला. पुण्याबाबत बोलायचे तर ग्रँडमास्टर अभिजित कुंटे याने या खेळाला प्रसिद्धी  मिळवून दिली. इशा करवदेने तर वुमन ग्रँडमास्टर हा किताबही मिळवला. आता या क्षेत्रात अशाच खेळाडूंमध्ये आणखी एक नाव यशस्वी होत आहे, ते म्हणजे आकांशा हगवणे. पुण्याचा लौकिक वाढवत आकांक्षाने वुमन इंटरनॅशनल मास्टर बनण्याचा मान मिळवला आहे.

यंदाचा मौसम संपला; पण नुकत्याच झालेल्या एम. जे. ट्रॉफी एव्हरी संडे रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत आकांशाने बाजी मारत मोसमाची अखेर आनंददायी केली. स्पर्धेच्या ४७व्या सीरिजमध्ये आठ फेऱ्यांमध्ये ७.५ गुणांची नोंद करत तिने विजेतेपद मिळवले. या स्पर्धेचे हे तिचे चौथे विजेतेपद ठरले आहे. या स्पर्धेत आकांशाने सलग सात फेऱ्यांमध्ये  विजय मिळवले, अखेरच्या फेरीत मात्र तिला महंमद फवाजशी बरोबरीवर समाधान मानावे लागले. आतापर्यंत असंख्य स्पर्धा खेळणारी आकांशा आता थोडाकाळ बुद्धिबळापासून लांब राहणार आहे. याला कारणही तसेच आहे. आकांक्षा सध्या पुण्यातल्या स. प. महाविद्यालयात बारावीत  शिकत आहे आणि परीक्षाही जवळ आली आहे. बुद्धिबळ हेच प्राधान्य असले तरी शैक्षणिक पात्रताही हवीच अशी आपल्या देशाची स्थिती आहे. कारण महाराष्ट्र सरकार नोकरीची ‘ए’ ग्रेड हमी देत आहे, म्हणून कोणी खेळाडू केवळ खेळावरच लक्ष केंद्रित करेल अशी परिस्थिती नाही. अशी स्थिती केवळ बुद्धिबळातच काय कोणत्याच खेळात नाही. त्यामुळे खेळाडूंना खेळाबरोबरच शैक्षणिक स्तरावरही अव्वल गुण मिळवण्यासाठी तत्पर राहावे लागते.

भारतात आणि भारताबाहेर अशा दर वर्षी जवळपास आठ स्पर्धा आकांक्षा खेळते. तिला इंडियन ऑइल कंपनीकडून शिष्यवृत्ती मिळाली आहे; पण प्रायोजकच नाहीत. अशा स्थितीत ज्या अधिकृत स्पर्धा होतात, केवळ त्यासाठीच सरकारी पातळीवरून मदत मिळते. जाण्या-येण्याचा व राहण्याचा खर्च मिळतो; मात्र आपले नॉर्म जास्तीत जास्त मिळविण्यासाठी ज्या स्पर्धांमध्ये परदेशात किंवा भारतात सहभागी व्हावे लागते तो खर्च आकांशाच्या कुटुंबीयांना प्रसंगी पदरमोड करून करावा लागतो. आपल्या देशाचे हेच दुर्दैव आहे, की क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन आणि आता काही प्रमाणात फुटबॉल व हॉकी वगळता बाकी खेळांना प्रायोजकच मिळत नाहीत.  खेळाडू दत्तक योजना वगैरे कागदावरच राहतात. अशा परिस्थितीतही आकांक्षा आपल्या कामगिरीचा आलेख उंचावते आहे हे खरंच कौतुकास्पद आहे.

बुद्धिबळातल्या चौसष्ट घरांचे आकर्षण आकांक्षाला लहानपणापासूनच होते. याच ओढीने वयाच्या सातव्या वर्षापासून ती जोसेफ डिसूजा यांच्याकडे बुद्धिबळाचे प्राथमिक धडे गिरवू लागली. सध्या ती मानांकित खेळाडू व प्रशिक्षक जयंत गोखले यांच्याकडे सराव करत आहे. रशियात २०१६मध्ये झालेल्या स्पर्धेत तिने वुमन इंटरनॅशनल मास्टरचा मान मिळवला. त्यानंतर या वर्षी तिने बोस्नियातील स्पर्धेत वुमन ग्रँडमास्टरचाही महत्त्वाचा नॉर्म मिळवला आहे. अठरा वर्षांखालील स्पर्धेत उझबेकिस्तानमध्ये तिने विजेतेपद पटकावले व ती बुद्धिबळ समीक्षकांच्या कौतुकास पात्र ठरली. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोळा वर्षांखालील स्पर्धा जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला बुद्धिबळपटू ठरली. तिचे वडील स्वतः मुष्टियोद्धा असल्याने घरात क्रीडासंस्कृती आहेच आणि याच पाठिंब्याच्या जोरावर आकांक्षा अवकाशाला गवसणी घालण्यासाठी सज्ज झाली आहे. येत्या मार्च महिन्यात तिची बारावीची परीक्षा संपल्यावर ती पुन्हा एकदा स्पर्धात्मक बुद्धिबळ  खेळण्यासाठी सज्ज होईल. २०१८मध्ये वुमन ग्रँडमास्टर खेळाडू बनण्याचे तिचे स्वप्न आहे. 

आकांक्षाच्या वडिलांचा स्वतःचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. या लेखाच्या माध्यमातून आयोजकांना, प्रायोजकांना मी आवाहन करतो, की त्यांनी एकत्र येऊन अशा उदयोन्मुख खेळाडूंना आर्थिक सहकार्य करून प्रोत्साहन दिले पाहिजे. हेच खेळाडू उद्या देशाची शान  ठरणार आहेत आणि तुमच्या मदतीचे सार्थक करणार आहेत.

रशियन वर्चस्व मोडून काढत आकांक्षाला स्वतःचे स्थान जागतिक स्तरावर निर्माण करायचे आहे. अर्थात, हे वाटते तितके सोपे नाही. तिच्याच शब्दात सांगायचे तर, ‘रशियन खेळाडू या खेळात मक्तेदारी टिकवून आहेत, ते त्यांचे डेडिकेशन आणि डिव्होशनमुळे. कोणत्याही स्तरावरील तिथे होणारी स्पर्धा पाहिली, की आपण किती मागे आहोत हे जाणवतं. म्हणूनच केवळ आणि केवळ बुद्धिबळावरच जर लक्ष केंद्रित केलं, तरंच भारतीय खेळाडू विश्वनाथन आनंदप्रमाणे त्यांच्या तोडीस तोड कामगिरी करू शकतील. परंतु त्यासाठी नॉर्म असणाऱ्या व आणखी नॉर्म मिळविण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या खेळाडूंना सरकारी आणि खासगी स्तरावरून मदत मिळाली पाहिजे, तरच तिथे जाऊन जास्तीत जास्त स्पर्धा खेळता येतील. हाच अनुभव महत्त्वाचा ठरेल. केवळ भारतात खेळल्याने त्यांच्यासारखे खेळता येणार नाही. त्या स्तरावरचा सराव, मार्गदर्शन सातत्याने मिळत राहिले पाहिजे. एखादा प्रशिक्षक तुम्हाला मदत करायला तयार झाला तरच हे घडेल.

जयंत गोखले हे पुण्यातील नामांकित खेळाडू आणि प्रशिक्षक आहेत. त्यामुळे आकांक्षाला उज्ज्वल भविष्य निश्चितच आहे यात शंका नाही. बुद्धिबळ हा केवळ खेळ नसून, तुमची सहनशक्ती वाढवणारा, तसेच मेंदूला चालना देणारा आणि प्रतिस्पर्धी खेळाडूचे डावपेच ओळखण्यासाठी मदत करणारा खेळ आहे. एखाद्याच्या मनाचा थांगपत्ता आपल्याला लागत नाही, असे आपण म्हणतो; पण या खेळात समोरच्या खेळाडूच्या मनाचा थांगपत्ता तुम्हाला लावावाच लागतो, तेव्हाच तो पुढची चाल कोणती खेळेल व त्याला कसे प्रत्युत्तर देता येईल हे आपल्याला ठरवता येते. पुण्याचा ग्रँड मास्टर अभिजित कुंटे यात मास्टर आहे. त्याचाच आदर्श घेत वाटचाल केली तर आकांक्षा अशा अनेक स्पर्धांमध्ये तर यशस्वी होईलच; पण तिच्या कारकीर्दीतील सर्वोच्च असा वुमन ग्रँडमास्टर किताबही प्राप्त करेल असा विश्वास वाटतो.

- अमित डोंगरे
ई-मेल : amitdongre10@gmail.com

(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. ‘क्रीडारत्ने’ या लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZVDBK
Similar Posts
चौसष्ठ घरांचा नवा राजा ग्रँडमास्टर होण्याचे स्वप्न बुद्धिबळातला प्रत्येक खेळाडू पाहतो; मात्र त्यात खूप कमी जण यशस्वी होताना दिसतात. पुण्याचा अभिमन्यू पुराणिक याने आपले हे स्वप्न पूर्ण करून महाराष्ट्राचा सातवा, तर पुण्याचा तिसरा ग्रँडमास्टर होण्याचा बहुमान मिळवला... ‘क्रीडारत्ने’ सदरात या वेळी पाहू या बुद्धिबळपटू अभिमन्यू पुराणिकबद्दल
बुद्धिबळातील नवी गुणवत्ता - सलोनी सापळे पुण्याच्या बुद्धिबळ क्षेत्राला प्रकाशझोतात आणणाऱ्या ग्रँडमास्टर अभिजित कुंटेला आदर्श मानत आज हजारो मुले-मुली या खेळात यशस्वी वाटचाल करत आहेत. अभिजितची ही धुरा पुढे नेत पुण्याच्या सलोनी सापळे हिने ‘वुमन इंटरनॅशनल मास्टर’चा तिसरा व अखेरचा नॉर्म मिळवून पुण्याचे नाव आणखी उंचावर नेण्याची कामगिरी केली आहे
टेनिसमधली नवी आशा : सालसा सचिनमुळे लहान मुले क्रिकेट खेळू लागली, साईना नेहवालमुळे मुली बॅडमिंटनमध्ये हातपाय मारायला लागल्या, त्याच धर्तीवर सानिया मिर्झाकडे बघत सालसासारख्या असंख्य मुली टेनिसकडे वळत आहेत आणि याच मुलींमधून देशाला सानिया मिर्झाची वारसदार सापडेल. ‘क्रीडारत्ने’ या साप्ताहिक सदरात आजचा लेख टेनिसपटू सालसा आहेरबद्दल
उत्कृष्ट फुटबॉलपटू घडवणारा परेश... फुटबॉलमध्ये परेश शिवलकर हे नाव केवळ पुण्यातच नाही, तर राज्य पातळीवरदेखील आता नवीन राहिलेले नाही. एक फुटबॉलपटू म्हणून जितकी अविस्मरणीय कारकीर्द त्याने गाजवली आहे, तेवढाच आज एक प्रशिक्षक म्हणून तो यशस्वी ठरत आहे... ‘क्रीडारत्ने’ सदरात या वेळी पाहू या फुटबॉलपटू आणि प्रशिक्षक परेश शिवलकरबद्दल...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language